ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली. तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वषार्तील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. एकप्रकारे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्याचाच प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरु झाला आहे.निधी मिळाल्याने मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झाली आहे. येथील आमदारांकडून विकासाच्या नावाखाली मागील काही वर्षात पीए व ठेकेदार यांच्या मागणीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा यापूर्वीच पुढे आला आहे. मुंब्रा कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कौसाच्या पुढील लोकवस्ती आठी, वाय जंक्शन च्या पुढेल लोकवस्तीसाठी वनखात्याच्या जागेवर केंद्र सरकारने मंजूर केलेले आणखीन एक कब्रस्थान बनविण्यात येईल, कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीचे वितरण प्रभाग निहाय केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मागणीनुसार, लोकांमध्ये जाऊन, लोकांना विचारुन, लोकशाही पद्धतीने विकास कामांसाठी प्रभागनिहाय हा ५० कोटीचा निधी खर्च होणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वषार्तील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पोलखोल करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांचे नाव या मतदार संघातून विधानसभेसाठी पुढे आले आहे. त्यामुळे आव्हाड आणि मुल्ला यांच्यात येत्या काळात आणखी शाब्दीक चकमकी घडणार असल्याचेच चित्र आहे.
मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध; अजित पवार गटाने आमदार आव्हाडांना दिले आव्हान
By अजित मांडके | Published: June 25, 2024 7:02 PM