मीरा रोड : २१ दिवसांत पैसे दुप्पट करून देतो सांगून व गुंतवणूकदार आणून दिल्यास मोठ्या कमिशनचे आमिष दाखवून नाशिकच्या भामट्याने अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ५० लाखांच्या फसवणुकीचा आकडा समोर आला असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
काशिमीरा पोलिस ठाण्यात मंगळवारी अशोक मोहिते (४७ विरार) यांच्या फिर्यादीवरून सतीश बसप्पा म्हेत्रे याच्याविरुद्ध भादंविसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त भास्कर पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पोतदार हे करीत आहेत.
मोहिते हे अगरबत्ती विक्रते असून म्हेत्रे याने २१ दिवसांत पैसे दुप्पट करून देतो सांगितले होते. त्यानुसार जून २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान मोहिते यांनी स्वतःचे, तसेच इतर लोकांकडून स्वीकारलेले २२ लाख ७९ हजार रुपये म्हेत्रेच्या खात्यात ट्रान्स्फर केले. याशिवाय आणखी अनेक लोकांची गुंतवणूक म्हणून कोट्यवधी रुपये म्हेत्रे याने घेऊन फसवणूक केल्याची शक्यता आहे.