ठाणे : कापूरबावडी येथील ठाकरसी शहा (५८) यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत (एसआरए) खोपटच्या गोकुळदासवाडी येथे तीन इमारतींचे बांधकाम करून देण्याचे कमलेश जिवावत आणि ललित पारेश यांनी आमिष दाखवून शहा यांच्यासह तिघांची ५० लाख १३ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार राबोडी पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.कामधेनू डेव्हलपर्सचे कमलेश जिवावत (५५) आणि त्यांचे भागीदार ललित पारेख यांच्या फर्ममार्फत खोपटच्या गोकुळदासवाडी येथे एसआरएअंतर्गत किंगस्टन एनक्लेव्ह ए, बी आणि सी या तीन विंगच्या तीन इमारतींचे विक्रीसाठी बांधकाम करणार असल्याचे शहा यांना सप्टेंबर २०१२ मध्ये सांगितले. एक विंगचा दर पाच हजार ८०० प्रतिचौरस फूट सांगून हे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण करणार असल्याचीही त्यांनी बतावणी केली. कमलेश यांच्यावर विश्वास ठेवत शहा यांनी ए विंगच्या तेविसाव्या मजल्यावरील २३०४ क्रमांकाच्या सदनिकेचा व्यवहार केला. त्यासाठी त्यांनी पाच लाख ६४ हजार रुपये रोखीने तर उर्वरित रक्कम धनादेशाने अशी १९ लाख १४ हजारांची रक्कम आॅक्टोबर २०१२ मध्ये दिली. इमारतीचे बांधकाम मुदतीमध्ये न केल्यास कामधेनू डेव्हलपर्सकडे जमा केलेल्या रकमेच्या १८ टक्के दराच्या व्याजासहित देण्याचे ठरले. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१९ मध्येही असे कोणतेच बांधकाम कामधेनू डेव्हलपर्सने केले नसल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे या इमारतीच्या सी विंगमधील पंचविसाव्या मजल्यावरील २५०२ क्रमांकाच्या सदनिकेसाठी नितीन मांजरेकर (रा. टेंभीनाका, ठाणे) यांनी १३ लाख ५० हजार रुपये भरले. चेतन निगडे (रा. कोलबाड रोड, ठाणे) यांनीही सी विंगमधील तेविसाव्या मजल्यावरील २३०४ या सदनिकेसाठी १७ लाख ४९ हजार ४०० रुपये भरले. या तिघांनाही कामधेनू डेव्हलपर्सने सदनिकांचे अलॉटमेंट लेटरही दिले. बांधकाम न केल्याने भरलेली रक्कम व्याजासहित परत करण्याचे आश्वासनही कमलेश आणि पारेख यांनी दिले. परंतु, रक्कम मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी या ग्राहकांनाच शिवीगाळ करून धमकी दिली. अखेर, याप्रकरणी शहा यांच्यासह तिघांनीही राबोडी पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी २०१९ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी राबोडी पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इमारतीचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली ५० लाख १३ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 9:33 PM
ठाण्यातील खोपटच्या गोकूळदासवाडी येथे एसआरए अंतर्गत तीन इमारतींचे बांधकाम केले जाणार असल्याची बतावणी करीत दोन बांधकाम व्यावसायिकांनी तिघांकडून ५० लाख १३ हजारांची रक्कम घेतली. प्रत्यक्षात सात वर्ष उलटूनही बांधकाम न केल्याने याप्रकरणी तिघांनी राबोडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देतिघांनी दाखल केली राबोडी पोलीस ठाण्यात तक्रारसात वर्षांपासून घेतले लाखो रुपये बांधकाम मात्र केलेच नाही