उल्हासनगर : महापालिकेतील जवळपास ५० टक्के फायली या आवक-जावक क्रमांक न टाकताच मंजुरीसाठी नेल्या जात असल्याचे उघड झाले आहे. फायलींचा नियमानुसार एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर प्रवास न होता नगरसेवक, कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाºयांकडे नियमबाह्य पद्धतीने स्वत:च त्या उचलून नेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कोणत्या विभागात नेमक्या किती फायली तयार झाल्या, यांचे रेकॉर्डच तयार होत नाही आणि फायली चोरीला जाऊनही त्यांची नोंद होत नाही, अशीही चर्चा आहे. हाती फायली नसताना बिले कशी काढली जातात, असाही मुद्दा उपस्थित झाला अहे.आता महापौरांनी गायब फायलींची यादी विभागप्रमुखांना मागितली आहे, तर आयुक्तांनीही प्रत्येक विभागानुसार फायलींच्या आढाव्याचे आदेश दिल्याने अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.पालिकेच्या बांधकाम विभागातून फाईल चोरल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर पालिकेतील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित नसल्याचे उघड झाले. महापौर मीना आयलानी यांनी सोमवारी पालिकेच्या विभागप्रमुखांची बैठक घेऊन किती फायली चोरीला गेल्या किंवा गायब आहेत, यांची यादी मागितली आहे. आयुक्त गणेश पाटील यांनीही फायलींचा आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक विभाग, विषय आणि प्रकरणांनिहाय फायलींचा आढावा घेतला, तर मोठे घबाड लागण्याची शक्यता आहे.>व्हिडीओ तयार केला कुणी?महापालिकेत यापूर्वीही फायली चोरण्याचे, गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकदा पालिकेची सुरक्षा, अन्य प्रकरणांत पालिकेकडे सीसीटीव्हीचे फुटेज मागितल्यावर ते मिळत नाही, असा लोकप्रतिनिधींचा आक्षेप आहे. असे असताना भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी बांधकाम विभागाच्या कार्यालयातील लोखंडी कपाटातून फाईल काढून शर्टमध्ये टाकून बाहेर गेले, नेमका तेवढाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला, याचीच चर्चा रंगली आहे. जर बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांनी हे रेकॉर्डिंग केले असेल तर ते व्हायरल कोणी केले, असा प्रश्न पोलिसांसह पालिका आयुक्त, महापौरांना पडला आहे.दोन दिवसांत हवा तपशील : रामचंदानी यांच्याकडे एक फाईल सापडल्याचे पोलीस रविवारी सांगत होते. पालिकेने मात्र दोन फायली चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. सोशल मीडियात जप्त फायलींची मोठी संख्या फिरते आहे. त्यामुळे रामचंदानी यांची १६ मे पर्यंतची पोलीस कोठडी संपण्यापूर्वी पालिकेला नेमक्या किती फायली चोरल्या गेल्या याचा अहवाल पोलिसांकडे सादर करावा लागेल. त्यामुळे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी किती फायली चोरीला गेल्या आणि गायब झाल्या, याची इत्यंभूत माहिती महापालिकेकडे मागितली आहे.नगरसेवकपद रद्द करण्याची मागणीफाईल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने भाजपाचे नगरसेवक रामचंदानी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव महासभेत आणण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी व आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली. तसा ठराव महासभेत आणला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन कदम, माजी शहराध्यक्ष संजय घुगे, दिलीप थोरात, युवा नेता मैनुद्दीन शेख आदींनी दिला.
५० टक्के फायलींची नोंदच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:43 AM