ठाणे : मीरा रोड आणि काशिमीरा येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींवर आरोप निश्चितीसाठी तसेच यातील गुन्हा शाबितीसाठी भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी ठाणे पोलिसांनी अमेरिकन न्यायालयामार्फत संबंधित पीडितांचे जबाब मिळवून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. ठाणे न्यायालयाने हे पत्र आता अमेरिकन न्यायालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७४ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांनी बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सखोल पडताळणीमध्ये ही माहिती उघड झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने ठाणे न्यायालयात सांगितले.संपूर्ण देशातच नव्हे तर अमेरिकेतही खळबळ उडवून देणाऱ्या या फसवणुकीच्या तपासातील एकेक धागा उलगडण्यासाठी पोलिसांना आता यातील अमेरिकेतील पीडितांचाही शोध घ्यावा लागत आहे. त्यासाठी काशिमीरा आणि मीरा रोड येथील कॉल सेंटरमध्ये मिळालेल्या संगणक तसेच हार्ड डिस्कमधील डेटाद्वारे फसवणूक झालेल्यांचे जबाब नोंदवणे, त्यांच्याकडून माहिती घेणे, हे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हार्ड डिस्कमधील संबंधित अमेरिकन नागरिकांचा आवाज आणि ठिकाणाचा शोध घेऊन त्याचा जबाब नोंदवण्यासाठी अमेरिकन पोलिसांची मदत मोलाची ठरणार आहे. अमेरिकन न्यायालयाने तसे आदेश तेथील पोलिसांना दिले आहेत. पीडितांचे जबाब नोंदवून घेण्याची विनंती ठाणे न्यायालयामार्फत अमेरिकन न्यायालयाला ठाणे पोलिसांनी केल्याचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. या प्रक्रियेसाठी ठाणे न्यायालयाने अमेरिकन न्यायालयाला एलआर अर्थात लेटर रोगेटरी पाठवले आहे. त्याद्वारे या कोट्यवधी डॉलर घोटाळ्यातील पीडितांचे आवाज आणि जबाब नोंदवणे सुलभ होणार असल्याचेही मणेरे यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे ५० पीडितांची फसवणूक झाल्याचे हार्ड डिस्कद्वारे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
५०० कोटी रुपयांचा घोटाळा
By admin | Published: January 14, 2017 6:16 AM