ठाणे - श्रावणी सोमवारनिमित्त यंदाही ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर फुलांनी सजणार आहे. रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट या मंदिरात केली जाणार आहे. तब्बल ५०० किलो फुलांनी हे मंदिर सजवले जाणार असून भाविकांना मंदिराचे वेगळे रूपडे पाहायला मिळणार आहे.पुरातनकालीन मंदिर म्हणून कौपिनेश्वर मंदिर ओळखले जाते. श्रावणी सोमवारी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी असते. या मंदिरात वाडी भरण्याची परंपरा आहे. नवस फेडण्यासाठी भाविक या मंदिरात येऊन आपल्या इच्छेनुसार वाडी भरतात. वाडी भरणे म्हणजे मंदिराची सजावट करणे. कधी बर्फाची, फुलांची, फळांची, गोड पदार्थांची वाडी भरली जाते. श्रावणातील दरसोमवारी फुलांची वाडी येथे भरली जाते, तर इतर दिवशी वेगवेगळ्या पदार्थांची वाडी भरली जाते, असे मंदिराचे गुरुजी विनायक गाडे यांनी लोकमतला सांगितले. श्रावणातील पहिल्या सोमवारी ५०० किलो फुलांची वाडी म्हणजेच मंदिर सजवले जाणार आहे. यात जरबरा, आॅर्केड, गुलाब, गोंडा, कामिनी, झावळी, गिलाडी, लीली या फुलांप्रमाणे १०० तोरणांचा समावेश आहे.
ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर सजणार ५०० किलो फुलांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:44 AM