ठाणे : मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी, मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मतदारांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे. मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा, या जनजागृतीसाठी येथील जिल्हा निवडणूक यंत्रणेद्वारे सुमारे ५०० नागरिक, विद्यार्थ्यांची रॅली १९ एप्रिल रोजी ठाणे शहरात काढली जाणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन किमीची ही रॅली सकाळी ७ वाजता निघणार आहे.‘रन फॉर व्होटर’ या दौडमध्ये सकाळी ६.३० वाजेपासून नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग राहील. यात सहभागी होणाºया सुमारे ५०० नागरिकांना यावेळी मतदारजागृतीच्या टोप्या, मेडल, पाणी, अल्पोपाहार आदींचा पुरवठा जिल्हा प्रशासनाद्वारे केला जाणार असल्याचे या मतदार जनजागृती स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी लोकमतला सांगितले. या रॅलीत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून निघणारी ही रॅली जांभळीनाका, दगडीशाळा, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोलपंप, साईबाबा मंदिर, घंटाळी मंदिर, राममारुती रोड, न्यू इंग्लिश स्कूल, गडकरी रंगायतन, भवानी चौकी आणि पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. या मतदार जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे नियोजन जिल्हा प्रशासनासह निवडणूक यंत्रणेने केले आहे. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित ठेवण्याचे नियोजन शहरातील शाळा, महाविद्यालये आदींनी केले आहे. तरुण, युवक, युवतींच्या सहभागामुळे या रॅलीस आगळेवेगळे महत्त्व येणार आहे.
‘रन फॉर व्होटर’साठी ५०० ठाणेकरांची दौड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:47 PM