बदलापूर : बदलापूर शहरात अनेक ठिकाणी रिक्षाचालक हे बेशिस्तपणा करतात. तसेच रिक्षा रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखा आणि उप प्रादेशिक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रे नसलेले ५२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. प्रथमच अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली.बदलापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर बेकायदा रिक्षातळ तयार करून अनेक रिक्षाचालक हे वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करत आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नव्हती. अखेर या प्रकरणात वाहतुक शाखेचे प्रमुख प्रशांत सतेरे आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अविनाश मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरात एकत्रित कारवाई केली. अनेक रिक्षाचालकांकडे कागदपत्रे नसल्याने त्या जप्त करण्यात आल्या. अनेक रिक्षाचालकांचे लायसन्स, बॅज आणि परमीटची तपासणी करण्यात आली. ज्या चालकांकडे कागदपत्रे नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली. एकूण ५०० च्यावर रिक्षांची तपासणी करण्यात आली तर ५२ रिक्षा जप्त करून त्या रिक्षांची खरी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यापुढेही अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे अधिकारी म्हणाले.
बदलापूरमध्ये बेकायदा ५२ रिक्षा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:54 PM