कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २००९ मध्ये ३१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी कल्याणचा समावेश ठाणे मतदारसंघात होता. ठाण्यात २००८ मध्ये झालेली लोकसभेची पोटनिवडणूक आणि २००४ मधील निवडणुकीत २२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.एकूण मतांच्या तुलनेत प्रस्थापित पक्षही विजयी ठरलेल्या शिवसेना उमेदवाराशी झुंज देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अन्य राजकीय पक्ष आणि अपक्षांनाही एकूण मतदानाच्या १६ टक्के मते मिळवता आलेली नाहीत. सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार प्रकाश परांजपे चार वेळा शिवसेनेतर्फे निवडून आले होेते. त्यापूर्वी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. भाजप व शिवसेना युतीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा गणला गेला. विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणाऱ्या परांजपे यांना २००४ मध्ये विजयाचा बोनस मिळाला होता. ते चौथ्यांदा निवडून आले होते. त्यावेळी एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. प्रकाश परांजपे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे २००८ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे त्यांचे चिरंजीव आनंद यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी ते विजयी झाले. यावेळी १६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.२००९ मध्ये पुनर्रचनेनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. तेव्हा कल्याण मतदारसंघ नव्याने तयार झाला. तेथून पुन्हा शिवसेनेतर्फे आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली. ते विजयी झाले. यावेळी रिंगणात २० उमेदवार होते. त्यापैकी १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. २०१४ मध्ये परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेतर्फे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यावेळी १७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.
चार लोकसभा निवडणुकांत ५३ जणांचे डिपॉझिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:08 PM