ठाणे : राष्टÑवादीचे आमदार व अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचाराकरिता तुरुंगात असलेले रमेश कदम यांच्याकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये ५३ लाख ४६ हजारांची रोकड शुक्रवारी दुपारी हस्तगत केली. तब्येत बरी नाही तसेच ठाण्यातून एक महत्त्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे सांगून कदम यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे पोलिसांनी छापा मारला असता कदम यांना रोकडसहित पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची हवा खात आहेत. १८ आॅक्टोबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नेले. तपासणीनंतर ठाण्यातील घोडबंदर रोडवर राहणाऱ्या मित्राकडून महत्त्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे कदम यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना सांगितले. या पोलिसांनीही नियम मोडत ती मागणी मान्य केली.
मुंबईतून कदम यांना थेट कारागृहात नेण्याऐवजी घोडबंदर रोड, ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेन्सी इमारतीतील तिसºया मजल्यावरील राजू खरे यांच्या ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर नेले. तेथून कदम हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील पार्सलची तपासणी केली असता त्यामध्ये ५३ लाख ४६ हजारांची रोकड आढळून आली. पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही रक्कम निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली असून आयकर विभाग याबाबत अधिक चौकशी करणार आहे.