सुरेश लोखंडे, ठाणेजुन्या, मोडकळीस आलेल्या व भाड्याच्या घरात भरत असलेल्या अंगणवाड्यांना हक्काची वास्तू प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाभरात ५३ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या बांधकामासाठी देखीलदोन कोटी ६६ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे. राज्य शासनाने आॅगस्टमध्ये काढलेल्या निर्णयानुसार अंगणवाड्यांच्या बांधकामासह दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला निधी प्राप्त करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, डीपीसीने दोन कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर केला. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावित केलेल्या ४१ अंगणवाड्यांना नुकतीच मंजुरी दिली. तर, उर्वरित १२ अंगणवाड्या या मागील वर्षाच्या असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार यांनी नमूद केले. नव्याने मंजूर झालेल्या या अंगणवाड्या शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यांसाठी आहेत. शाळेत दाखल करण्यापूर्वी सहा वर्षे वयोगटांतील बालकांना शालेय संस्कार देण्यासाठी जिल्ह्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत. यातील महत्त्वाच्या बहुतांशी अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:ची वास्तू नाही. ती मिळवून देण्यासह नवीन ५३ अंगणवाड्यांना मंजुरी प्राप्त झाली आहे. भाड्याच्या किंवा गोठ्यांमधील अंगणवाड्या आता स्वत:च्या वास्तूत भरणार आहेत. नव्या शासन अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पाच्या १० टक्के रक्कम ७५ अंगणवाड्यांच्या दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी सुमारे ८० लाख रुपये याआधीच खर्च केला आहे. त्यानंतर, आता दोन कोटी ६६ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून प्रत्येक अंगणवाडीसाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून या अंगणवाड्यांची वास्तू उभी केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यात ५३ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी
By admin | Published: January 21, 2016 2:35 AM