ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ५३५ प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी गुरुवारी जारी केले. यातील बहुतांश शिक्षक सध्या कर्तव्यावर असून काही सेवानिवृत झालेले आहेत. गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या या निवडश्रेणीचा आर्थिक लाभ ऐन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर झाल्याचा आनंद शिक्षकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
लाभापासून वंचित असलेल्या या शिक्षकांना हा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केलेल्या प्रयत्नांनाही यश आले आहे.
शिक्षकांना शासकीय सेवेत १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणीचा आर्थिक लाभ देण्यात येतो. तर, सेवेची २४ वर्षे पूर्ण झाल्यावर निवडश्रेणीचा लाभ दिला जातो. मागील काही वर्षांपासून या ५३५ शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित ठेवले होते. मात्र, प्रभारी शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी विशेष पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निवडश्रेणीचा लाभ हा १९८६ पासून आजतागायत पात्र शिक्षकांना देण्यात आला असून यामध्ये सेवानिवृत्त आणि सेवा बजावणा-या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे.
--------
पात्र शिक्षकांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे...
अंबरनाथ - ६१
कल्याण- ५५
मुरबाड - ८६
शहापूर - १६७
भिवंडी - १६६
.........