लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन हजारांच्या बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या मुंब्य्रातील दशरथप्रसाद भोलू श्रीवास (३६) याला ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी रात्री कळव्यातून अटक केली. त्याच्याकडून दहा लाख ७४ हजारांच्या २ हजारांच्या ५३७ बनावट नोटा जप्त केल्या असून, या नोटा उत्तर प्रदेशातून आणल्याचे तो चौकशीत सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.भारतीय चलनातील दोन हजारांच्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या बनावट नोटा घेऊन त्या चलनात वटविण्यासाठी कळवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेने सापळा रचून पायी येणाऱ्या दशरथप्रसादला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे बनावट नोटा मिळाल्या. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. रविवारी त्याला ठाणे न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, पोलीस उपनिरीक्षक खुस्पे, पोलीस हवालदार पी.डी. कदम, पोलीस नाईक रिजवान सय्यद, एम.एस. मोरे, एस.एस. माने, चंद्रकांत वाळुंज, आर.व्ही. पवार यांनी केली.
ठाण्यात दोन हजारांच्या ५३७ बनावट नोटा जप्त
By admin | Published: June 19, 2017 2:31 AM