सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिकेने पदोन्नतीने ५४, अनुकंपातत्वावर २० तर वारसाहक्क पद्धतीने ३६ पैकी २५ पदे भरल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच बारवी प्रकल्पग्रस्त ३४ पैकी २६ पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग- ३ व ४ ची ६० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असून अधिकारी वर्गाची ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. दरम्यान पदोन्नती, वारसा हक्क व अनुकंपतत्वावर पदे भरण्याची मागणी कामगार संघटनेने महापालिकेकडे लावून धरली होती. वर्ग-४ मधून वर्ग-३ मध्ये लिपीक व मुकादम यापदी एकून ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच शैक्षणिक पात्रतानुसार २० पदे अनुकंपातत्वावर घेण्यात आली असून लाड व पागे समितीनुसार वारसहक्काने ३६ पैकी २५ जणांची नियुक्ती केली. तर इतर पदे तांत्रिक अडचणीमुळे भरण्यात आले नाही. १३ जणांच्या वारसांनी अध्याप अर्ज दाखल केला नाही. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. या नियुक्तीने कामगारांनी समाधान व्यक्त केले जात असतांना, कामगार नेते दिलीप थोरात यांनी मात्र पदोन्नती, वारसाहक्क, अनुकंपातत्त्वावरील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे केले.
उल्हासनगर महापालिकेसह जिल्हयातील इतर महापालिकेला बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. बारवी धरण प्रकल्पग्रस्त नागरिकांना पाणी पुरवठा करण्याच्या प्रमाणात नोकरी देण्याचे आदेश शासनाचे आहेत. बारवी धरण प्रकल्पग्रस्ता पैकी ३४ जणांना महापालिकेत सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. ३४ पैकी ५ प्रकल्पग्रस्त अल्पवयीन तर एकाने कागदपत्र महापालिकेकडे जमा केली नाही. तसेच ३ जणांनी अटीशर्ती पूर्ण केल्या नाहीत व अनुभव नाही. इतर २५ प्रकल्पग्रस्तांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याची माहितीही उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली. प्रकल्पग्रस्त नागरिकांनाचा नोकरीचा मार्ग मोकळा झाल्याने, त्यांनी आनंद व्यक्त केला. महापालिकेचे उत्पन्न व खर्च बघता नवीन नोकर भरती करणे शक्य आहे. असे संकेत नाईकवाडे यांनी दिले आहे.