डाेंबिवली : महावितरणने शहापूर उपविभागातील सावरोली गावात शनिवारी पहाटे केलेल्या तपासणीत १९ ठिकाणी विजेचा चोरटा वापर आढळून आला. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पंपासाठी वीजचोरी होत असल्याची धक्कादायक बाब यावेळी उघड झाली. दरम्यान, शहापूर उपविभागात महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत असून, आतापर्यंत वीजचोरांकडून ५५ लाख रुपये वसूल केले आहेत.
उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पहाटे सावरोली गावातील वीजपुरवठ्याची तपासणी करण्यात आली. यात १९ ठिकाणी विजेचा बेकायदा वापर सुरू असल्याचे आढळून आले. वीजचोरांनी सुमारे ३५ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
शहापूर, धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, पवारपाडा, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व परिसरातील गावांमध्ये वीजचोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या चोरट्यांनी चोरून वापरलेल्या विजेचे ५५ लाख रुपयांचे वीजबिल वसूल केले आहे. यापुढेही वीजचोरट्यांविरुद्ध धडक मोहीम सुरूच राहणार आहे. दरम्यान, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली कटकवार, सहायक अभियंते चेतन वाघ, सुरज आंबुर्ले, विश्वजित खैतापूरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या ३५ जणांच्या पथकाने ही कारवाई केली.