लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमधील मजुरांच्या हाताला १०० दिवसांचे काम उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) हाती घेतली आहे. याद्वारे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १४४ ग्रामपंचायतींमधील मजुरांसाठी पाच हजार ५३४ कामे हाती घेतली आहेत. यासाठी स्त्री, पुरुषांस प्रत्येकी २३८ रुपये मजुरी दिली जात आहे. जिल्ह्यातील मजुरांसाठी तीन लाख ४२ हजार १२८ मनुष्य दिवस कामांचे नियोजन केले आहे. यासाठी चार कोटी ६३ लाखांची कामे २०२०-२१ या कालावधीत खर्च करण्याचे नियोजन आहे. यातून ग्रामपंचायतींमधील पाच हजार ५३४ कामे आणि यंत्रणांद्वारे हाती घेतलेली ६९३ कामे आदी सहा लाख २२७ कामांवर खर्च केला जात आहे. या कामांवर काम करणाऱ्या मजुरांना दिवसाकाठी २३८ रुपये मजुरी दिली जात आहे. या मजुरांचे वेतन बँकेत जमा होत असल्याचे उघड झाले आहे. या सेल्फवरील कामांची मजुरांनी मागणी करताच ती उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी मजुरांना या शेल्फच्या कामासाठी फाॅर्म नं. ४ भरून देण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.
या कामांपैकी सर्वांगीणदृष्ट्या उपयुक्त ठरणारी जनसुविधांची कामे, ग्रामपंचायतींच्या बांधकामांसह स्मशानभूमी, दफनभूमी आणि गावरस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय गावपातळीवरील तलावांमधील गाळ काढणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारी दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय शाळा, अंगणवाडी आदींच्या दुरुस्तींच्या कामांनाही प्राधान्य दिले जात आहे. तहसीलदार तथा कार्यक्रम अधिकारी, गटविकास अधिकारी तथा सह कार्यक्रम अधिकारी यांच्यामार्फत या कामांना मंजुरी देऊन ती स्थानिक मजुरांकडून प्राधान्यक्रमाने करून घेण्याचे नियोजन जिल्ह्यात केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील या एमआरईजीएसची कामे मजुरांच्या हाताला देऊन त्यांची रोजगार समस्या सोडवण्यात येत आहे.
.......