लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या ४८ तासांत तौक्ते चक्रीवादळामुळे झाडांवरून पडून जखमी झालेल्या ५६ पक्ष्यांची सुटका वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशनने केली. यातील उपचार करून बरे झालेल्या काही पक्ष्यांना सोडण्यात आले तर काही पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत.
या काळात वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशनची बचाव टीम २४ तास काम करीत होती. झाडे कोसळल्याने किंवा पावसाच्या पाण्यात भिजल्याने उडण्यास असमर्थ असणाऱ्या पक्ष्यांबाबत फोन जास्त प्रमाणात होते. ते ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागातून आले होते. पक्षी विस्थापित झाले होते. असोसिएशनने नेहरू सायन्स कोविड सेंटरमधून घारदेखील वाचविली. ठाणे येथे असोसिएशनच्या केंद्रात या पक्ष्यांची काळजी घेतली जात आहे. तंदुरुस्त असलेले पक्षी सोडण्यात आले. तौक्ते चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे झाडांवर असलेली पक्ष्यांची घरटी झाड तुटल्याने खाली पडली होती. त्यामुळे पक्षी जखमी झाले होते. जे बरे झाले त्यांना सोडण्यात आले. तर जे जखमी आहेत त्यांच्यावर असोसिएशनचे स्वयंसेवक उपचार करीत आहेत, असे असोसिएशनचे आदित्य पाटील यांनी सांगितले.
---------------