रविंद्र साळवे, मोखाडायेथील आदिवासी मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जव्हार प्रकल्पा अंतर्गत या भागात ३० आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र, त्यात २०१० ते १५ या काळात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दुदैवाची गोष्ट म्हणजे मृत्यू झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना निधी आभावी मदतही मिळू शकलेली नाही. साप चावणे, नदीमध्ये किवां डोहात बुडून अथवा आजारी पडल्यामुळे हे मृत्यू घडले आहेत. निधीचा आभाव, कर्मचाऱ्यांनी कमतरता अशी कारणे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत.या आश्रमशाळांमध्ये १८ हजार १६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु आरोग्यदायी शिक्षणाची वल्गना करणाऱ्या या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असता. अस्वच्छता, शैक्षणिक साहित्याचा आभाव आणि अधिक्षकांचे दुर्लक्ष हेच वास्तव त्यामागे आहे. २०१०-११ ते २०१४-१५ च्या दरम्यान, याच आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या ४४ मुला-मुलींचा मृत्यू झाला असून २०१३-१४, १४-१५ च्या दरम्यान मृत्यू झालेल्या १३ मुलांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येकी ७५ हजार रुपयांची मदत निधी अभावी मिळू शकलेली नाही. या आश्रमशाळेत व्यवस्था नसल्याने नदीओढ्यावर आदिवासी मुलांना आंधोळ व कपडे धुण्यासाठी जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. तसेच आश्रमशाळेत पहिलीमध्ये शिकणारी मुले सुद्धा येथे राहतात यामुळे त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. परंतु येथील ३० आश्रमशाळेतील महिला व पुरूष अधिक्षकांची २८ पदे रिक्त आहेत. यामुळे निवासी मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी विकासमंत्री या जिल्ह्याचे असूनही ही भयानक स्थिती आहे. परंतु त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत.
आश्रमशाळांत ५ वर्षात ५७ बालमृत्यू
By admin | Published: September 01, 2015 11:58 PM