ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून ते २३ मे या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या फ्लाइंग स्कॉडने केलेल्या कारवाईत सुमारे ५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ४२ लाखांच्या मद्यसाठ्याचा समावेश आहे. याप्रकरणी ८९ जणांना अटक केली असून एकूण १३० गुन्हे दाखल केले होते.ठाणे फ्लाइंग स्कॉडचे निरीक्षक सुनील कणसे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विविध पथकांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यांत ही कारवाई केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात अवैध मद्यावर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाइंग स्कवॉडने कंबर कसली होती.त्यानुसार, ११ मार्च ते २३ मे या कालावधीत या पथकाने एक लाख ५५ हजार ५५० लीटर रसायन, सहा हजार ७०५ लीटर हातभट्टीची, देशी १३५ लीटर, विदेशी १२४ लीटर, २७३ लीटर बीअर, ताडी ३५५५ लीटर, नीरा २४५ लीटर अशी दारू जप्त करण्यात आली आहे.तसेच यामध्ये ८३ ज्ञात जणांवर गुन्हे, तर ४७ अनोळखींवर गुन्हे दाखल करून ८९ जणांना अटक झाली आहे. तर, २७ वाहने जप्त केली आहेत. त्यांची किंमत १४ लाख ७० हजार इतकी आहे.तर, ४२ लाख ९७ हजार ४३१ रुपयांचा अवैध मद्यसाठा असा एकूण ५७ लाख ६७ हजार ४३१ रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे.
निवडणूक काळात ५७ लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 5:46 AM