लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून मुंबई विभागात ठाणे जिल्हा चौथ्या स्थानी आहे. जिल्ह्यातील एकदोन नव्हे तर तब्बल ५७८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सर्वाधिक आहेत. ठाण्यातील एकूण २६१ पैकी १४१ म्हणजे अर्ध्याहून जास्त शाळांनी शंभर नंबरी यश मिळवले आहे.जिल्ह्यातील १०० टक्के यश मिळवलेल्या शाळांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ११४ शाळा आहेत. नवी मुंबईतील ७६, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रतील ६८, अंबरनाथ-बदलापुरातील ५३, भिवंडी तालुक्यातील ४३, शहापुरातील २६, उल्हासनगरमधील २४, कल्याण ग्रामीण तालुक्यातील १८, तर मुरबाडमधील १५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे निकालही नव्वदीपार लागले आहेत. जिल्ह्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा निकाल सर्वाधिक ९७.९५ टक्के, तर भिवंडी मनपा क्षेत्राचा निकाल ९३.८७ टक्के इतका लागला आहे.यंदाचा दहावीचा निकाल हा आतापर्यंतच्या निकालांतील सर्वोच्च निकाल आहे. गेल्या १० वर्षांत आणि त्यामागील निकाल पाहता हा भरघोस निकाल आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. जे उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश न होता त्यांच्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने मार्गदर्शन, समुपदेशन व फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येईल.- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा परिषद
५७८ शाळा शंभर नंबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:07 AM