भिवंडी- मुंबई वडोदरा महामार्गामध्ये बाधित शेतजमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी मयत आदिवासी कातकरी महिला ठकी सवर हिच्या जागी दुसऱ्या कातकरी वृद्ध महिलेस उभे करून शासनाची फसवणूक करून संगनमताने ५८ लाख ४२ हजार ९९६ रुपये आदिवासी कातकरी वृद्ध महिलेस उभे करून लाटणाऱ्या जमीन दलाल, शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा तात्काळ दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे, जया पारधी,संगीता भोमटे,आशा भोईर,जयेंद्र गावित,मुकेश भांगरे आदींच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भागीरथी मुकणे या अशिक्षित वयोवृद्ध आदिवासी महिलेला उभे करून हे पैसे लाटण्यात आले त्या भागीरथी मुकणे हिचे दारिद्र्य लाखो रुपये मिळून ही तसेच असताना फसवणुकीचा भांडाफोड झाल्या नंतर या अशिक्षित महिलेच्या वतीने शासनाच्या बँक खात्यात जमा केले असून हे पैसे नक्की कोणी काढले, कोणी खाल्ले कोणी परत बँक खात्यात जमा केले, याची चौकशी व्हावी अशी मागणी सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केली.
दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंदवीण्याबाबत लेखी कळविले असता त्यांनी गुन्हा भिवंडी येथील कार्यालयात शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने तेथे नोंदविण्यात यावा असे लेखी पत्र दिल्याने उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी सक्षम अधिकारी यांना नेमून तसे पत्र दिले.त्यानंतर सायंकाळी उशिरा हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
महिला ठिणगीच्या कार्यकर्त्यांचा गनिमीकावा
श्रमजीवी संघटना बुधवारी आंदोलन करीत असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांना दिले असताना पैसे शासन खात्यात जमा झाले असून गुन्हे नोंदविण्यात येत आहे त्यामुळे धरणे आंदोलन न करण्याबाबत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना पत्र दिले होते.दरम्यान आंदोलनकर्ते कार्यालयावर धडकणार म्हणून प्रांत कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता मात्र आंदोलन सुरू होण्या पूर्वीच महिला ठिणगीच्या आंदोलक महिला कार्यकर्त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल होत मुख्य आंदोलक बाहेर येताच या महिलांनी कार्यालयाच्या प्रांगणातच घोषणा देत आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.