ठाणे : मागील १२ ते १५ दिवसापासून विलीनीकरणाच्या मुद्यावरुन आंदोलनाचे हत्यार एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले होते. परंतु या कर्मचाऱ्यांच्या संपावर पगार वाढीचा तोडगा काढण्यात आल्यानंतरही अनेक ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसून आले आहे. ठाण्यातही ३ हजारपैकी ५९३ कर्मचारी शनिवारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आठ आगारातून ३१ बसेस या विविध मार्गावर सोडण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्यावतीने देण्यात आली.
राज्यभरासह ठाणे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून रान उठले आहे. त्यानुसार मागील १२ ते १५ दिवसापासून जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस रस्तावर धावली नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान एसटीचे झाले आहे. अशातच या आंदोलनाची दखल घेत, राज्य शासनाने देखील पगारवाढ करीत तोडगा काढला. परंतु शासनाने विलीनीकरणाच्या मुद्या मार्गी लावला नाही. तर पगारवाढ देत असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील शासनाकडून करण्यात आली. मात्र, असे असले तरी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यात आता, परिवहन विभागाकडून देखील संप मागे घेवून कर्मचारी कामावर हजर न झाल्यास कडक पावले उचाण्यात येतील असा इशारा देखील देण्यात आला आहे.
आजही राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे संपातून माघार घेत, कामावर रुजू होणे पसंत केले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता या संपात फुट पडल्याचेही दिसू लागले आहे. ठाणे जिल्ह्यात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक असे मिळून तीन हजार ०४१ इतके कर्मचारी पटलावर असून त्यापैकी १४९ कर्मचारी अधिकृतरित्या रजेवर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संपात दोन हजार ७३२ इतके कर्मचारी हजर होते. त्यापैकी केवळ ५९३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून आजही एक हजार ९९० कमर्चारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या आवाहनाला कर्मचाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
असे असले तरी संपातून कर्तव्यावर हजर झालेल्या चालक वाहकांच्या मदतीने जिल्ह्यातील ठाणे १, ठाणे २, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, विठ्ठलवाडी आणि वाडा या आठ डेपोमधून ३१ बसेस सोडण्यात आल्या. यामध्ये ठाणे १ येथील ठाणे ते स्वारगेट या मार्गावर ५ शिवनेरी बसेस सोडण्यात आल्या तर, ठाणे ते बोरीवली यामार्गावर सध्या १२ बसेस सोडण्यात आल्या. तसेच ठाणे २ येथून ३ सध्या बसेस ठाणे – बोरीवली मार्गावर सोडण्यात आल्या असल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली.