सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोनाची लस १६ जानेवारीपासून दिली जाणार आहे. लसीसाठी ‘कोविन’ ॲपवर ८,८५५ जणांनी नोंदणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका व ग्रामीण भाग मिळून एकूण ५९, ५७२ जण या लसीचे प्राधान्यक्रमाचे लाभार्थी ठरले आहेत. जिल्ह्याभरात ८५० केंद्रांवर त्यांना लस दिली जाईल. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी याबाबतचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील ६६, ४४७ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यातील ५९, ५७२ जणांना प्राधान्य क्रमाने लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात १०० लसीचा डोस लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. लसीच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यात १९० आइसलँड रेफ्रिजरेटर व १९७ डीपफ्रीजर आणि १९९ कोल्ड बॉक्सची व्यवस्था जिल्हा प्रशासन, सिव्हिल रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने केली आहे. या लसीचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळावा यासाठी जिल्ह्यात नुकतीच १२ ठिकाणी रंगीत तालीम पार पडली आहे.