ठाणे :
जबरी चोरी, वाहन, मोबाईल चोरी व नोकराने केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुचाकी, रिक्षा, मोबाइल, सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.मागील काही दिवसात या राबोडी व आजूबाजूच्या परिसरात दुचाकी व इतर वाहने आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार राबोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश धोंगडे, पोलीस उपनिरिक्षक दिपक पाटील यांना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला असता, त्यांनी काशिफ अन्वर मुल्ला (२६) रा. मुंब्रा, कौसा, शब्बीर कासम अली शेख (२२) रा. अमृतनगर मुंब्रा, मुश्ताक युनुस कुरेशी (२३) रा. पहिली राबोडी ठाणे, शौकत मेहबुब शेख (२६) रा. गोकळुनगर, मंदा सज्रेराव मंदाळे (४६) रा. नालासोपारा आणि श्रीराम सिंग (२८) रा. गोपाळगड बिहार यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ असे ११ गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोबाईल फोन, दुचाकी, रिक्षा, सोन्याच्या बांगडय़ा आणि १ लाख ७० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.