ठाणे : लोकमान्य नगर भागातील रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मृत्यु नंतर या रुग्णावर वागळे इस्टेट भागातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु आता या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती येथील कामगारांना मिळाल्यावर आता त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना आलटून पालटून एकच हॅन्डग्लोज वापरावा लागत आहे. सॅनिटायझरची सुविधा नाही, किंवा इतर कोणत्याही सुविधा नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यात येथील आम्ही जवळ जवळ सर्वच जण त्या नागरीकाच्या संपर्कात आलो आहोत, त्यामुळे आता आमची तपासणी होणार का नाही, अशी काळजी त्यांना सतावू लागली आहे. लोकमान्य नगर भागातील एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना त्याच्या मृत्यु नंतर समोर आली आहे. त्या नुसार त्याच्या अंत्ययात्रेत, दर्शनासाठी आलेल्या ५५ नागरीकांना पालिकेने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. परंतु आता ज्या वागळे इस्टेट स्मशानभुमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, तेथील कर्मचारी वर्ग आता भितीच्या सावटाखाली आला आहे. या स्मशानभुमीत जवळ जवळ १२ कर्मचारी कामाला आहेत, एकच हॅन्डग्लोज त्यांना आलटून पालटून वापरावा लागत आहे. सॅनिटायझरची सोय नाही, इतर सुविधांची देखील वाणवा आहे. असे असतांना त्या रुग्णाचा मृतदेह देखील याच स्मशानभुमीत आणण्यात आला होता. पंरतु आम्हाला त्याची कल्पना नव्हती. नागरीकांनी देखील आम्हाला याची माहिती दिली नाही. आता आम्ही वृत्तपत्र, सोशल मिडियावर वाचले तेव्हा आमच्या लक्षात आले की आम्ही जो मृतदेह जाळला त्याला कोरोनाची लागण झाली होती. आधीच आम्हाला सुविधांची वाणवा आहे आता त्यात या निमित्ताने आणखीन भर पडली आहे. त्यात त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेने विलगीकरण कक्षात नेले आहे, परंतु आता आमचे काय असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
त्या स्मशानभुमीतील १२ कामगारांचा जीव टांगणीला, पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 4:54 PM