ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या चाकू हल्यानंतर त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, गेल्या सात महिन्यांचा विचार केल्यास ठाण्याच्या विविध भागात शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ६० हल्ले झाले असल्याची माहिती पोलीस दप्तरी उपलब्ध आहे. त्यापैकी ४८ गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर १२ घटनेतील हल्लेखोर अद्याप फरार आहेत. त्यातही दाखल असलेल्या गुन्ह्यात सर्वाधिक हल्ले हे पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांवरच झाले आहेत. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हल्ले झाले आहेत.
शासकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले ही मागील कित्येक वर्षांपासूनची परंपरा आहे. यापूर्वीदेखील ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच ठाणे पालिकेच्या अंतर्गत असलेल्या मुंब्रा येथे बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईस गेलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केला होता. याप्रकरणी बद्रुद्दिन या माथेफिरूला अटक केली होती. त्यापूर्वीदेखील महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर हल्ला झाला होता. गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सतत हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत.
१२ घटनांमधील आरोपी अद्यापही फरार
ठाण्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ या काळात तब्बल ६० ठिकाणी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४८ गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, १२ घटनांमधील आरोपी अद्यापदेखील फरार आहेत. एकीकडे गुन्हेगारी कमी करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्याप्रमाणात प्रयत्न होत असताना शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत मागील तीन वर्षांत वाढ झाली आहे.
--------------