डोंबिवली : निवडणुकांच्या तोंडावर केडीएमसीच्या ताफ्यात ज्या नव्या बसेस आल्या. त्यापैकी ६० वाहक-चालकांअभावी आगारातच धूळखात आहेत. नोकरभरतीच न झाल्याने ही समस्या ओढवली आहे. गेल्या महिनाभरात परिवहनच्या उत्पन्नातही लाख-दीड लाखाने घट झाली आहे. आगामी काळात रिक्त पदे भरण्यासाठीचा ठराव परिवहनच्या सभेसह महासभेत ठेवण्यात येणार आहे. सध्या ज्या बस तांत्रिकदृष्ट्या खराब होत आहेत, त्याऐवजी नव्या बसेस चालवण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. यासंदर्भात परिवहन सभापती नितीन पाटील यांनी सर्व माहिती घेऊन आयुक्तांची भेट घेतल्याचे सांगितले. नोकरभरतीसंदर्भासह अन्य विषयांवर आयुक्त सकारात्मक आहेत. नव्या बस आल्यानंतर त्यासाठी भरावयाचे ३५ कोटी रुपयेदेखील महापालिकाच देणार आहेत. त्यासाठी आधी १५ कोटींची तरतूद करण्यात येणार असून अन्य रकमेसंदर्भात लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. तो झाल्यावर परिस्थिती काही प्रमाणात बदलेल.दिवाळीच्या सुट्या सुरू असून शाळा-महाविद्यालये बंद आहेत, तरीही गेल्या दोन दिवसांपासून उत्पन्न वाढले असून ते सहा लाखांच्या घरात आहे. ते आणखी वाढेल. दोन महिन्यांपूर्वी ते ७ लाखांच्या घरात गेले होते. तसेच नोकरभरतीसंदर्भात निर्णय घेण्यात येत आहे. लवकरच सर्व नव्या बसेस धावतील. - नितीन पाटील, सभापती, केडीएमटी
केडीएमटीच्या ६० बसेस आगारातच पडून
By admin | Published: November 20, 2015 2:05 AM