मुंबई : ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात आता आकर्षक म्युझिकल कारंजे आणि विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हे काम हाती घेतले असून, त्यासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे.
ठाण्यातील मासुंदा तलावाचे पाणथळ क्षेत्र सुमारे ९ हेक्टर असून, तलावाचा परीघ सुमारे १२०० मीटर इतका आहे. ठाण्यात पर्यटन आणि मनोरंजनाच्या अनुषंगाने फारच कमी स्थळे उपलब्ध आहेत. त्यातून पर्यटकांकडून मासुंदा तलावाच्या परिसरात फेरफटका मारायला पसंती दिली जात असल्याचे दिसते. हा तलाव ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळ आणि मुख्य शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिक नियमित भेटी देतात.
तसेच दरवर्षी या भागात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम-मराठी नववर्ष रथयात्रा, महोत्सव, प्रदर्शने, गणपती विर्सजन, छट पूजा आदी कार्यक्रम होत असतात. ठाणे पालिकेमार्फत या तलावाच्या परिसरात सुशोभित पदपथ, ॲम्फी थिएटर, नाना नानी पार्क आदी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.
सुयोग्य थीमनुसार काम होणारठाण्यातील रायलादेवी तलावाच्या परिसरात निर्माण केल्या जात असलेल्या सुविधांप्रमाणेच या तलावाच्या परिसरात सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या तलावाच्या पाणथळ क्षेत्राच्या सभोवताली काही ठिकाणी मोकळ्या जागा, उद्याने आहेत. या भागात विविध सेवासुविधांसाठी वाव आहे. त्यातून या भागात प्रॉमिनेड, लँडस्केपिंग, सुनियोजित फूडकोर्ट, अस्तित्वातील उद्यान आणि मोकळ्या जागांचे सुयोग्य थीमनुसार सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.
या सुविधा तयार केल्या जाणार- लेझर शोसह मोठ्या आकाराच्या आकर्षक म्युझिकल कारंजांची उभारणी. - तलाव परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई. - प्रॉमिनेड, लँडस्केपिंग प्रस्तावित. - नागरिकांना चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी फूडकोर्ट. - अस्तित्वातील उद्यान व मोकळ्या जागांचे थीमनुसार सुशोभीकरण.
एमएमआरडीएने निविदा मागविल्यानागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर लेझर शोसह मोठ्या आकाराचे आकर्षक म्युझिकल कारंजे बसविण्याचेही नियोजन एमएमआरडीएने केले आहे. त्याचबरोबर या परिसरात विद्युत रोषणाई करून संपूर्ण परिसराचा आकर्षक मनोरंजन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. या परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती एमएमआरडीए करणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.