लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका एकूण ४०० खाटांची दोन रुग्णालये उभारणार आहे. रुग्णालय व लॅबसाठी तब्बल ११ कोटींचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत विनानिविदा साहित्य खरेदीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये एका बेडशिट, उशी आणि उशीच्या कव्हरसाठी ६० लाखांचा खर्च दाखवण्यात आला आहे. त्यानुसार एका बेडशिटसाठी ६००, तर उशीसाठी ९०० रुपये आणि त्याच्या कव्हरसाठी १८० रुपये किंमत दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने कोविड-१९ महामारीच्या काळात महापालिकेने राज्य शासनाचे शासकीय प्रसूतिगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच शांतीनगर येथे असलेले खासगी साई प्लॅटिनियम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये किमतीला भाडेतत्त्वावर घेतले. तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारी व औषधांचा पुरवठा केला. याशिवाय तहसील कार्यालयाची नवीन इमारत, पालिकेची अभ्यासिका, शाळा, रेडक्रॉस हॉस्पिटल, टाटा आमंत्रा इमारत, वेदांत कॉलेज इमारत आदी अनेक इमारती कोविड रुग्णालयाच्या उपचारासाठी महापालिकेने घेतल्या होत्या. कालांतराने रुग्णसंख्या कमी झाल्याने काही मालमत्ता महापालिकेने परत केल्या. दरम्यान, पालिकेने कोणार्क रेसिडेन्सी येथे स्वतःची लॅब सुरू केली असून, कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
रिजेन्सी ॲँटेलिया येथे बांधलेली वास्तू महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर येथे २०० बेडचे अद्यावत रुग्णालय सुरू करण्यास पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. रिजेन्सी ॲँटेलियाशिवाय आणखी २०० बेडचे रुग्णालय उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. या ४०० बेडच्या रुग्णालय आणि लॅबमधील साहित्य खरेदीसाठी तब्बल ११ कोटींचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. याला गुरुवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात येणार आहे.
चौकट
एका आयसीयू बेडसाठी दीड लाखाचा खर्च
रिजेन्सी ॲंटेलिया येथील रुग्णालयासह दुसरीकडे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून, ४०० खाटांचे रुग्णालय डोळ्यांसमोर ठेवून साहित्य मागविले आहे. ४०० पैकी ६० खाटा आयसीयू असणार आहेत. आयसीयूच्या एका बेडची किंमत एक लाख ४० हजार रुपये दाखविली आहे. महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण हाेणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार असल्याची ग्वाही महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली.