मीरा रोड - आपल्या मुलाने खोट्या सह्या करून बनावट बक्षीसपत्र बनवून महापालिका अधिका-यांच्या संगनमताने राहत्या घराच्या निम्म्या जागेची मालमत्ता कर आकारणी पालिकेच्या संगनमताने स्वत:च्या नावे केल्याने त्याच्यासह पालिका आयुक्त व संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार खुद्द वडिलांनीच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदींकडे केली आहे. घोडबंदर गावातील गोवळा देव मंदिराजवळच्या गौरीशंकर चाळीत ६२ वर्षांचे जुलकदर मोहम्मद टकी शेख हे कुटुंबीयांसह राहतात. घर हे त्यांच्या आई रशीदाबाई यांच्या नावे असून, त्यांचे ३० वर्षां पुर्वी निधन झाले आहे. पण पालिकेच्या मालमत्ता कर नोंदी रशिदाबाई यांचेच नाव आहे. पानपट्टी चालवणारे जुलकदर यांचे भाऊ - बहीण वारले असले तरी त्यांची मुलं आदी वारस आहेत.तसे असताना मुलगा महमद शरीफ याने खोट्या सह्या करून आॅक्टोबर २०१७ मध्ये बक्षिसपत्र बनवून घेतले व ते ए कलाम खान या वकिलाकडून नोटरी करून घेतले. त्यात वडील जुलकदर हे त्यांची आई रशिदा यांचे कायदेशीर वारस असल्याचे व राहत्या घरापैकी ३०० चौ. फुट जागा मुलगा मोहमद शरीफ याला बक्षीस म्हणून दिल्याचे म्हटले आहे.शिवाय घराच्या हिश्श्यास नवीन कर आकारणी करण्यापासून स्वतंत्र वीज मीटर, फोटोपास, शिधावाटप पत्रिका, मतदान ओळखपत्र आदी शरीफच्या नावे करण्यास वडिलांची हरकत नसल्याचे नमूद केले. त्यात साक्षीदार म्हणुन नातलग रशिदा व परिचीत अरविंद सिंग यांची नावं आहेत. बक्षीसपत्राच्या आधारे पालिकेने शरीफच्या नावे नवीन कर आकारणी मंजूर केली. जुलकदर यांना सदर बाब समजताच त्यांनी पालिकेतून कागदपत्रं मिळवत ४ आॅगस्ट रोजी आयुक्त व कर निर्धारक संकलक यांना भेटून आपल्या मुलाने बनावट बक्षीसपत्राच्या आधारे पालिका अधिका-यांशी संगनमत करून नवीन कर आकारणी करून घेतल्याची तक्रार केली. पण पालिकेकडून काहीच कारवाई न झाल्याने आता जुलकदर यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी साकडं घातलं आहे.
खोटं बक्षीसपत्र बनवणा-या मुलावर गुन्हा नोंदवण्याची ६२ वर्षीय पित्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 9:06 PM