अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्ज घेत आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांच्या टोळीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक २६ वर्षांची तरुणी ही या टोळीची मास्टरमाइंड आहे.
नवी मुंबईला राहणाऱ्या दिशा पोटे यांना कामोठे इथल्या जयंत बंडोपाध्याय यांचे घर खरेदी रिसेल प्रॉपर्टी म्हणून खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांच्याच तोंडओळखीच्या रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांनी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून त्यांची आणि बंडोपाध्याय यांची कागदपत्रं घेतली. त्यानंतर अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशा पोटे यांच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज करण्यात आला. तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम जमा होणार होती. त्या बंडोपाध्याय यांच्या नावाने मात्र एक बनावट अकाउंट नवी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेत उघडण्यात आले.
इकडे आयडीबीआय बँकेने दिशा पोटे यांची कागदपत्रं तपासून त्यांचे कर्ज मंजूर केले आणि कर्जाची रक्कम ही थेट बंडोपाध्याय यांच्या बनावट अकाउंटमध्ये वर्ग झाली. यानंतर सिडकोच्या एनओसीसाठी बँकेने पोटे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने बँकेने बंडोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी बंडोपाध्याय यांनी आपले घर विकायचे आहे हे जरी खरे असले, तरी आपल्याला अद्याप कर्जाचे पैसे मिळालेले नसून आपले आयसीआयसीआय बँकेत अकाउंटसुद्धा नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आयडीबीआय बँकेने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.
तपासाची दिशा पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी नवी मुंबईच्या शब्बीर सय्यद मोहम्मद पटेल या बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडले. त्याच्या चौकशीतून रसिका नाईक, मंदार नाईक आणि रमाकांत नाईक यांचा सुगावा लागताच या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रं बनवून देणारे कुणाल नानजी जोगडीया आणि किशोर प्रवीण जैन या दोघांना अटक करण्यात आली. तर सर्वात शेवटी बंडोपाध्याय म्हणून अकाउंट उघडणाऱ्या राजेंद्र वामन शेट्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्वांच्या ताब्यातून पोलिसांनी अपहार झालेल्या रकमेपैकी जवळपास ४३ लाख रुपयांचं सोनं आणि ९ मोबाईल हस्तगत केले.