ठाणे : बनावट सह्या करून संस्थेची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या ठाण्यातील एका कुटुंबाविरुद्ध नौपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. बनावट ठरावाच्या आधारे सुमारे ६३ लाख रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.ठाण्यातील श्री साई शहर व ग्रामीण विकास सामाजिक सेवा संस्थेचा हा वाद आहे. पोखरण रोड क्रमांक-२ वरील गांधीनगरचे रहिवासी देवनारायण दसई यादव यांनी आपण या संस्थेचे सचिव आणि मुलगा निलेश यादव हा खजिनदार असल्याचा दावा नौपाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. वसंत विहारचे रहिवासी राजदेव शुभकरण यादव, त्यांच्या पत्नी गिरिजा राजदेव यादव आणि मुलगी प्रतिमा यादव यांनी बनावट ठरावाच्या आधारे आपण संस्थेचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य असल्याचे भासवले. संस्थेचे नौपाडा येथील ठाणे मध्यवर्ती बँकेत खाते असून बनावट ठरावाची कागदपत्रे आरोपींनी बँकेत दिली. त्याआधारे संस्थेच्या खात्यातून ६३ लाख ६४ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप देवनारायण दसई यादव यांनी केला आहे. २०१६ साली झालेल्या या घोळाची तक्रार यादव यांनी दिल्यानंतर नौपाडा पोलिसांनी राजदेव यादव आणि त्यांची पत्नी तसेच मुलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. ओऊळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींनी संस्थेची महत्त्वाची पदे स्वत:कडे घेणाºया ठरावाची प्रत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दिली होती.हा ठराव धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये संस्थेच्या खात्यातून रकमा काढल्या. आरोपींनी राजेश कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. ही कंपनी आरोपींशीच संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे.
बनावट सह्या करून संस्थेचे ६३ लाख हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 2:01 AM