ठाणे: नौपाडा परिसरातून गेल्या अडीच वर्षामध्ये गहाळ झालेले नऊ लाख ७५ हजारांचे तब्बल ६५ मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी रविवारी दिली. आपले मोबाईल पुन्हा सुखरुप परत मिळाल्यामुळे या सर्व फिर्यादींनी समाधान व्यक्त केले आहे.
नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २०२२ ते २०२४ या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या ६५ मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला. यात २०२२ मधील १३ तर २०२३ मधील २७ आणि २०२४ मधील २५ अशा ६५ मोबाईलचा शोध पाेलिसांनी घेतला. यातील बहुतांश मोबाईल गहाळ झाल्यानंतर ज्यांच्या हाती लागले, त्यांनी त्यांची विक्री केली होती. काही मोबाईल हे उत्तरप्रदेश तसेच इतर राज्यातही विक्री झाले होते.
त्यामुळे हे मोबाईल परत मिळवितांना पोलिसांनी संबंधितांना यातील गुन्हयाची तीव्रता निदर्शनास आणून ते परत कुरियरने नौपाडा पोलिस ठाण्यात पाठविण्याबाबत फोनद्वारे समुपदेशन केले. हे मोबाईल परत मिळविण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, हवालदार लक्ष्मीकांत सोनावणे, गंगाधर तिर्थकर, करण पाटील, सतीश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली. हे सर्व मोबाईल रविवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित ६५ फिर्यादींना सुखरुप सुपूर्द करण्यात आले आहेत.