ठाणे: अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या ( 22 जानेवारी ) दिवशी ठाणे जिल्ह्यातील १२ शासकीय रुग्णालयांमध्ये दिवसभरात ६६ महिलांच्या डिलिव्हरी (प्रसूती) यशस्वी पार पडली. त्यामध्ये २७ मातांच्या पोटी मुले जन्माला आले आहेत. उर्वरित ३९ मातांचा'लेकी' जन्माला आल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात झालेल्या १२ प्रसूतींमध्ये ११ मुली १ मुलगा जन्माला आला आहे.
अयोध्येतील मंदिरात प्रभू रामलल्लाच्या दर्शनाची सर्वच जण वाट पाहत होते. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा एका सणासारखा पार ही पडला. देशभर राम मय वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान गरोदर मातांनी या दिवशी आपल्या पोटीसुद्धा राम जन्माला यावा अशी अनेक महिलांची इच्छा होती. अशात ठाणे जिल्ह्यातील राज्य शासनाच्या ११ आणि ठामपाच्या १ अशा एकूण १२ रुग्णालयांमध्ये ६६ नैसर्गिक आणि सीझर या दोन प्रकारच्या डिलिव्हरी ( प्रसूती ) पार पडल्या आहेत. या दिवसभरात २७ मुले आणि ३९ मुली जन्माला आल्या असून या दिवशी मुलांपेक्षा मुलींची संख्या ही १२ ने जास्त असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली.
चार रुग्णालयात जन्माला आले फक्त मुलेटोकावडे, खर्डी, अंबरनाथ या रुग्णालयात प्रत्येकी एक - एक डिलिव्हरी झाली असून तेथे मुले जन्माला आली. तर मालवणी या रुग्णालयात दोन डिलिव्हरीत दोन मुले जन्माला आले आहेत.
सर्वाधिक डिलिव्हरी भिवंडीतएकूण डिलिव्हरी मध्ये सर्वाधिक १४ डिलिव्हरी भिवंडी रुग्णालयात झाल्या आहेत. तेथेही ८ मुली आणि ६ मुले जन्माला आले आहेत. तर मध्यवर्ती उल्हासनगर रुग्णालयात १३ डिलिव्हरीमध्ये ६ मुले आणि ७ मुली जन्माला आल्या आहेत. ठामपाच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ डिलिव्हरी करण्यात आल्या. यामध्ये ११ मुली जन्मला आल्या असून १ मुलगा जन्माला आल्याची माहिती ठामपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांनी दिली.