कल्याण : एका घटस्फोटित महिलेला संकेतस्थळावर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ६६ लाखांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून मुख्य आरोपी यज्ञेश फिलिप्स ऊर्फ यज्ञेश पांचाळ याच्यासह अन्य १४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तक्रारदार महिला ही डोंबिवली पूर्वेत राहते. १९९७ मध्ये तिचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा आहे. भविष्यात एक आधार असावा, यासाठी तिने पुनर्विवाहाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एका संकेतस्थळावर संपर्क साधून आपल्या नावाची नोंद केली होती. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे अहमदाबाद येथे राहणाऱ्या यज्ञेशने तिच्याशी संपर्क साधला. तिच्या खाजगी मेल अकाउंटवर मेसेजद्वारे तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधून त्याने तिला लग्नाची मागणी घातली. कालांतराने मलेशियामध्ये आपली एक कंपनी असून तेथील ख्रिसमस ट्री नावाचा पार्ट खराब झाल्याची बतावणी करीत तो नवीन घेण्यासाठी त्याने तिच्याकडून तब्बल ६६ लाख ३३ हजार १८२ रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आरोपीच्या बँक खात्यात हे पैसे वेळोवेळी जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु, त्याने तिच्याशी संपर्क तोडून लग्न न करता फसवणूक केल्याचे समोर आले आहे. २९ जानेवारी २०१५ ते ९ जुलै २०१५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून महिलेला ६६ लाखांचा गंडा
By admin | Published: January 11, 2016 2:32 AM