पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षभरात एकूण ६७ हजार ८५५ जणांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या उद्दीष्टापैकी ठाणे जिल्ह्याने ८८ टक्के तर पालघर जिल्ह्याने ७७ टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्र विभागाने दिली आहे. वाढत्या वयोमानानुसार, प्रत्येक माणसामध्ये मोतीबिंदू यासारख्या आजाराची लक्षणे दिसू लागतात. त्यातच, शासनाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्ह्याला ठराविक उद्दीष्ट निश्चित करून दिले जाते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यासाठी २०१६-१७ यावर्षासाठी ५८ हजार ०५३ तर पालघर जिल्ह्यासाठी २१ हजार ५२६ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ठाणे सिव्हील रुग्णालयात महिन्यातून आठ दिवस तर उल्हासनगरमध्ये चार दिवस आणि शहापूरात दोन दिवस तसेच पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून जव्हार येथे महिन्यातून दोन दिवस याबाबत शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ५१ हजार २८४ तर पालघर जिल्ह्यातील १६ हजार ५७१ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ती केल्यानंतर लेन्स लावण्यात येते.
६७ हजार ८५५ जणांना मोतीबिंदू
By admin | Published: June 22, 2017 12:00 AM