ठाणे : ‘स्मार्ट सिटी’ हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या ठाणे शहरातील ६७ टक्के स्त्रियांच्या घरात शौचालय नाही. सार्वजनिक शौचालयाचा वापर त्यांना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखताना त्यांची कुचंबणा होते. १२ टक्के स्त्रियांना याच काळात पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, अशी माहिती ‘अ पिरीयड ऑफ शेरिंग’ या उपक्रमांतर्गत म्युज फाऊंडेशनने ठाण्यातील विविध वस्त्यांमधील स्त्रियांच्या मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याच्या पद्धतीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे.
संस्थेचे निशांत बंगेरा, नेहाली जैन व ललिता टी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाण्यात २०१९ या वर्षभरात किशोरवयीन, मध्यमवयीन व अल्पवयीन या तीन गटांतील स्त्रियांचे सर्वेक्षण करण्यात आले. आझादनगर, बंजाराबस्ती, मनोरमानगर, रामबाग(उपवन), शांतीनगर, शांतीनगर ( ठाणे पूर्व) आणि नागसेननगर या व अशा १५ वस्त्यांमधील स्त्रियांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता. ३५ महिला स्वयंसेवकांनी दारोदारी जाऊन स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. सर्वेक्षणात आढळले की, ७१ टक्के स्त्रिया डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. नेहाली यांनी सांगितले की, ठाण्यातील या कोणत्याही वस्तीमधील सार्वजनिक शौचालयामध्ये डस्टबिन नव्हते. याचा अर्थ असा की, कमीतकमी ७ टक्के महिलांनी चुकीच्या पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावल्यामुळे परिसरात अधिक प्रदूषण झाले. शाळेत जाणाऱ्या ५६ टक्के मुली म्हणाल्या की, त्यांच्या शाळांमधील स्वच्छतागृहे घाण असल्याने त्यांचे मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन बदलण्यासाठी त्यांना घरी यावे लागते. अस्वच्छ स्वच्छतागृहे ही मुलींचे शाळा सोडून घरे येणे तसेच मुली मासिक पाळीच्या काळात गैरहजर राहण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कमीतकमी १० टक्के महिला २४ तासांत सॅनिटरी नॅपकिन बदलत नाहीत कारण त्यांना पुरेसे नॅपकिन्स खरेदी करणे परवडत नाही.