ठाणे : कर्जाचे आमिष दाखवून विरारच्या रहिवाशाची ६ लाख ७३ हजारांना फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले. खंडणीविरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे.विरारच्या नारंगी रोडचे रहिवासी अजय धीरजलाल दमानिया हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. २०१३ साली त्यांना १० लाखांच्या कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी दमानिया हे बँकांकडे चौकशी करत असतानाच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी त्यांना कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून प्रक्रिया शुल्कापोटी ८० हजार ४११ रुपये भरण्यास सांगितले. दमानिया यांनी ही रक्कम धनादेशाद्वारे दिली, पण त्यांना कर्ज मंजूर झाले नाही. दमानिया यांनी पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी त्यांना काही बँकांचे खाते क्रमांक देऊन त्या खात्यांत पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, दमानिया यांनी तीन लाख ५२ हजार २४० रुपये जमा केले, तरीहीे त्यांना कर्ज मंजूर झाले नाही. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रिलायन्स आणि ओएनजी वैश्य कंपनीच्या दोन विमा पॉलिसी काढाव्या लागतील, असे आरोपींनी सांगितल्यानंतर दमानिया यांनी पॉलिसीही काढल्या. दरम्यानच्या काळात आरोपींनी बँक खात्यांमध्ये २ लाख ४० हजार ८१२ रुपये दमानिया यांच्याकडून भरून घेतले. मात्र, पाठपुरावा करूनही कर्ज मिळत नसल्याचे पाहून, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दमानिया यांनी शनिवारी ठाणेनगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अनुप सोनी, नीतू शर्मा, अभिषेक मित्तल, ऋषी अग्रवाल व सोनिया वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींनी दमानिया यांच्याशी फोनद्वारेच संपर्क साधला आहे. त्यामुळे आरोपींची नावे खरी आहेत की खोटी, हे आताच सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्जाचे आमिष दाखवून ६.७३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:08 AM