सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित आदी उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या ६५२ शाळांमध्ये पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील सहा हजार ८९६ बालकांची निवड झाली आहे. यामध्ये चार हजार ६२० विद्यार्थी-विद्यार्थिनींची पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी निवड केली आहे. सर्व शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित ठेवलेल्या प्रवेशातून गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची या शालेय प्रवेशासाठी निवड झाली आहे. पुणे येथील राज्यस्तरीय पातळीवरून या विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे येथील शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.
शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली यंदा जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमासह सर्व भाषिक ६५२ शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील पहिल्या सोडतीमध्ये पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी चार हजार ६२० विद्यार्थ्यांची, तर पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड पुणे येथून करण्यात आली आहे. पहिल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या या सहा हजार ८९६ विद्यार्थ्यांना एक किमी अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. या सर्व विद्यार्थिनी प्रवेश घेतल्यानंतर दुसरी सोडत एक ते तीन किमीच्या अंतरावरील शाळांमधील प्रवेशासाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरही विद्यार्थी शिल्लक राहिल्यास तीन किमीपेक्षा अधिक लांबच्या शाळांसाठीदेखील सोडत काढून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.
सध्याच्या पहिल्या सोडतीमध्ये सहा हजार ८९६ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड झाली आहे. जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिलीच्या चार हजार ६२० विद्यार्थ्यांची निवड झाली. जिल्हाभरातून ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात दिले जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या सोडतीद्वारे चार हजार ६२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. उर्वरित सात हजार १५६ विद्यार्थी पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या निवडीसाठी राज्यस्तरीय पातळीवर दुसरी सोडत काढण्यात येईल. पहिलीच्या वर्गाप्रमाणेच शाळांमध्ये एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गात दिले जाणार आहेत.