लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - अनोळखी व्यक्तीने कॉल करून क्रेडिट कार्ड खात्यात रिवॉर्ड पॉईंट जमा करतो सांगून फसवणूक केलेली ७ लाख ३५ हजारांची रक्कम परत मिळवण्यात मीरा भाईंदर - वसई विरार सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे .
भाईंदर परिसरात राहणाऱ्या मनीष यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला . कॉल करून क्रेडिट कार्ड खात्यात रिवॉर्ड पॉईंट जमा करायचे आहे सांगून मनीष यांच्या कडून कार्डची माहिती घेतली . मनीष यांनी देखील अनोळखी व्यक्ती असून सुद्धा कार्डची माहिती दिली . कार्डची माहिती मिळताच सायबर लुटारूने मनीष यांच्या क्रेडिट कार्ड द्वारे ७ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याचा अर्ज सायबर पोलीस ठाण्यास २८ नोव्हेम्बर रोजी मिळाला होता .
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह गणेश इलग, पल्लवी निकम, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, राजेश भरकडे, सोनाली मोरे यांच्या पथकाने तांत्रिक चौकशी सुरु केली . माहितीच्या आधारे मनीष यांची रक्कम रोझारपे ह्या पेमेंट वॉलेटवर वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तात्काळ त्या पेमेंट गेटवे कंपनीचे नोडल आधिकारी यांच्याशी पोलिसांनी तात्काळ फोनद्वारे संपर्क साधला व ईमेलद्वारे पत्रव्यवहार केला . त्यामुळे फसवणुकीच्या रकमेचा पुढील व्यवहार थांबवण्यात येऊन ती रक्कम पुन्हा मनीष यांच्या खात्यात परत करण्यात आली .