उल्हासनगर - पेपर कप बनविणारी मशिन खरेदीसाठी पंतप्रधान महिला रोजगार योजनेद्वारे बँकेतून घेतलेले ७ लाख ७५ हजाराचे कर्ज मीनाक्षी शर्मा यांनी क्रांती राजपूत यांना दिले. मात्र त्याबदल्यात रजपूत यांनी ४ नोव्हेंबर २०१६ पासून आजपर्यंत मशीन न दिल्याने, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शर्मा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणाऱ्या मीनाक्षी शर्मा याना पेपर कप बनविण्याची कंपनी टाकण्यासाठी पेपर कप बनविणारी मशीन हवी होती. त्यानी क्रांती राजपूत यांच्याकडे मशीन देण्यासाठी बोलणी केली. त्यानंतर पंतप्रधान महिला रोजगार योजनेतून मशीन घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र मधून ७ लाख ७५ हजाराचे कर्ज घेऊन, क्रांती रजपूत यांना ४ नोव्हेंबर २०१६ साली दिले. मात्र मशीन देण्याचा बहाणा करून आजपर्यंत मशीन देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाली. हे लक्षात आल्यावर मीनाक्षी शर्मा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून क्रांती रजपूत यांच्या विरोधात शनिवारी तक्रार दाखल केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी क्रांती रजपूत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून रजपूत यांचा शोध पोलीस घेत आहेत.