लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केसरविक्रीच्या व्यवहारात ठाण्यातील एका व्यापाऱ्याची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी नवी दिल्लीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.इंडिया मार्ट डॉट कॉम या वेबसाइटद्वारे उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदारांना व्यवहारासाठी एक मोठे आॅनलाइन व्यासपीठ उपलब्ध आहे. नौपाड्यातील दमाणी इस्टेटजवळ राहणारे रजत ललित गुप्ता यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याजवळील ५ किलो केसर विकण्यासाठी या वेबसाइटची मदत घेतली होती. तो तपशील पाहून नवी दिल्ली येथील न्यू फ्रेण्ड कॉलनीतील एलआयआय ट्रेड पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे हरुण काझमी आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार अमरीन खनम यांनी रजत गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे गुप्ता यांच्याशी संपर्क साधून त्यांनी केसरखरेदीत रस दाखवला. ५ किलो केसरचा सौदा ७ लाख १४ हजार रुपयांमध्ये निश्चित झाल्यानंतर गुप्ता यांनी केसर पाठवले. त्याचा मोबदला मात्र गुप्ता यांना मिळाला नाही. पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, गुप्ता यांनी शनिवारी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
केसरविक्रीत व्यापाऱ्यास ७ लाखांचा फटका
By admin | Published: July 17, 2017 1:12 AM