भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी ७ एप्रिलला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी भरण्याच्या आज अखेरच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रभाग समिती १ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्राबल्य असून आघाडीतील तत्त्वानुसार यंदाचे सभापतीपद काँग्रेसला मिळणार असले, तरी यंदाही त्यावर राष्ट्रवादीनेच दावा केला आहे. त्यानुसार, राष्ट्रवादीकडून बर्नड डिमेलो यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग समिती २ मध्ये भाजपाचे प्राबल्य असल्याने युतीतील तहानुसार यंदाच्या सभापतीपदावर पुन्हा भाजपानेच दावा केल्याने भाजपाकडून अॅड. रवी व्यास यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग समिती ३ मध्येसुद्धा भाजपाचेच प्राबल्य असून विद्यमान सभापतीपद सेनेकडे असल्याने ते यंदा भाजपाला मिळणार आहे. त्यानुसार, भाजपाकडून कल्पना म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने प्रभाग समिती २ मधील तडजोडीनुसार प्रभाग समिती ४ मधील सभापतीपदाची मागणी भाजपाकडे केली. त्याला भाजपाने मान्यता दिल्याने सेनेकडून जयंतीलाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग समिती ५ मध्ये काँग्रेसचे प्राबल्य असून येथील सभापतीपदासाठी गटनेते जुबेर इनामदार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. तर, भाजपाकडून अश्विन कासोदरिया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रभाग समिती ६ मध्ये राष्ट्रवादी व शिवसेना, बहुजन विकास आघाडी, भाजपा युतीच्या सदस्यांची संख्या प्रत्येकी ९ असली, तरी राष्ट्रवादीतील दोन नगरसेवक अनुक्रमे भाजपा व सेनेत गेल्याने सेना व भाजपाचे संख्याबळ अनुक्रमे ६ व ३ ने वाढले आहे. तसेच युतीतील करारानुसार यंदाचे सभापतीपद सेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपाला सत्तास्थापनेसह विविध निवडणुकांत वेळोवेळी पाठिंबा देणाऱ्या बहुजन विकास आघाडीतील भावना राजू भोईर यांना उमेदवारी देण्यात आली. यावरून एकूण सहा प्रभागांपैकी १ ते ४ व ६ मध्ये बिनविरोध निवडणुका होणार असून प्रभाग ५ मध्ये मात्र निवडणूक पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग सभापतीपदांसाठी सात उमेदवारी अर्ज
By admin | Published: April 01, 2017 11:39 PM