अंबरनाथ - अंबरनाथमध्ये रशियाहून परतलेली ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तिला ओमीक्रॉंन व्हेरियंटची लागण आहे का? याचा तपासणीसाठी तिचे नमुने लॅबला पाठवण्यात आले आहेत.
अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात वास्तव्याला असलेली ही मुलगी आई वडिलांसह फिरण्यासाठी रशियाला गेली होती. २८ नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परतले. त्यानंतर या मुलीला त्रास सुरू झाल्याने तिची तपासणी केली असता तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, या मुलीच्या वडिलांची टेस्ट निगेटिव्ह आली असून आईच्या टेस्टचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. या तिघांनाही सध्या घरीच होम क्वारंटाईन करण्यात आले असून यानंतर अंबरनाथ नगरपालिकेने ही मुलगी राहत असलेली इमारत सील केली आहे.
दरम्यान, या मुलीची आई दोन दिवस कामावर गेल्याचीही माहिती समोर आली असून त्यामुळे आता हे कुटुंब ज्यांच्या संपर्कात आले होते, अशा सर्वांची तपासणी केली जात आहे.