- अजित मांडके
ठाणे : हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरणे आवश्यक आहे. त्याच नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ठाणे शहरातही हे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत एक लाख ७३ हजार १०२ दुचाकीस्वारांवर हेल्मेट न वापरल्याने कारवाई झाली. मागील तीन महिन्यात २८ हजार २४९ एवढ्यांवर कारवाई झाली. सीटबेल्ट न वापरणाऱ्या ३५ हजार ८६ वाहन चालकांवर मागील वर्षभरात कारवाई करण्यात आली, तर मागील तीन महिन्यांत १६ हजार ६४२ जणांवर कारवाई झाली. एकूण अपघातांपैकी ७० टक्के अपघातांमधील मृत्यू हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरल्याने होतात, असे निदर्शनास आले आहे.
ठाणे शहरात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. वाहन चालविताना हेल्मेट किंवा सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. काही महिन्यांपासून हेल्मेट आणि सीटबेल्ट न लावणाऱ्यांकडून वसूल केली जाणारी दंडाची रक्कम वाढविण्यात आली. मात्र, त्यामुळे फरक पडला नाही. केवळ ठाणे शहरातील १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधी एक लाख ७३ हजार १०२ दुचाकी स्वारांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ कोटी ६५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत २८ हजार २४९ जणांवर कारवाई करीत एक कोटी ४१ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ३५ हजार ८६ चालकांनी सीटबेल्ट न लावण्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ७१ लाख १ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत १६ हजार ६४२ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३३ लाख २८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
एकूण अपघातांपैकी ७० टक्के अपघातात हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वारांवर मृत्यू ओढवतो. नव्या चारचाकी वाहनांमध्ये एअर बॅगचे प्रमाण वाढले आहे. परंतु सीटबेल्ट लावला नसेल आणि अपघात झाला तर त्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे गरजेचे असून, चारचाकी वाहनात बसल्यावर सीटबेल्टचा वापर करणे गरजेचे आहे.
- बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक पोलीस
हेल्मेट नसेल आणि अपघात झाला तर चालकाच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव होतो. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू होऊ शकतो, म्हणून दुचाकी चालविताना हेल्मेट गरजेचे आहे. तसेच सीटबेल्ट वापरला तर अपघात झाल्यास एअरबॅग खुल्या होऊन मोठी जीवितहानी टाळता येऊ शकते.
- डॉ. भीमराव जाधव, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा
मी सुरुवातीला हेल्मेट वापरत नव्हतो. परंतु माझ्या डोळ्यासमोर एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यांमुळे अपघात झाला. तो दुचाकीवरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातादरम्यान त्याने हेल्मेट घातले नव्हते. ही घटना पाहिल्यापासून मी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली.
- दुचाकी चालक
ठाणे शहर (जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२)
हेड - केसेस - दंड
विनाहेल्मेट प्रवास- १,७३,१०२ - ८,६५,४८,५००
जानेवारी ते मार्च २०२२
विनाहेल्मेट प्रवास - २८,२४९ - १,४१,१४,५००
ठाणे शहर (जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२)
हेड - केसेस - दंड
सीटबेल्टविना प्रवास - ३५,०८६ - ७१,०१,३००
जानेवारी ते मार्च २०२२
सीटबेल्टविना प्रवास - १६,६४२ - ३३,२८,२००