ठाणे : अतिशय गर्दीचा आणि झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखल्या जाणा-या लोकमान्य-सावरकरनगर भागाचा ७० टक्के बायोमेट्रिक सर्व्हे पूर्ण झाला असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. येत्या काही दिवसांत येथील १०० टक्के सर्व्हे पूर्ण होईल, असेदेखील पालिकेने सांगितले आहे.
याशिवाय, जयभवानीनगर भागासाठी ४८ सूचना, हरकती प्राप्त झाल्या असून येथे दोन ते अडीच हजार रहिवाशांना हक्काचे घर मिळणार आहे. उथळसर भागातील आझादनगर भागाचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्याची यादी येत्या तीन ते चार दिवसांत प्रसिद्ध होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. तर, राबोडीचा बायोमेट्रिक सर्व्हे अद्यापही सुरू झालेला नाही. तिकडे हाजुरीची पहिली यादी प्रसिद्ध होऊन पाच ते सहा महिने झाले आहेत. परंतु, उर्वरित ४६५ जणांची पुरवणी यादी अद्यापही प्रसिद्ध न झाल्याने येथील योजना पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. शहरातील इतर भागांतही टेक्निकल सर्व्हे सुरू झाला असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले.