लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात गेल्या तीन दिवसांत ६४० खड्डे बुजविण्यात आल्यामुळे व अनंत चतुर्दशीच्या सायंकाळपर्यंत आणखी ७१० खड्डे भरले जाणार असल्यामुळे विसर्जन मार्गातील खड्ड्यांचे विघ्न आता पूर्णपणे टळणार आहे, असा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.
महापौर आणि पालिका आयुक्तांनी सक्त आदेश देऊनही गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यास विलंब झाला; पण आता बाप्पांचा परतीचा मार्ग सुखकर होणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ठाणे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. ठाणे स्थानक ते घोडबंदरपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्याचे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कामे सुरू झाली. मात्र, आज बुजविलेला खड्डा दुसऱ्या दिवशी पुन्हा उखडत आहे. दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले तरी खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.
गेल्या तीन दिवसांत २ हजार ७०० चौरस मीटर रस्त्यावरील ६४० खड्डे बुजविले आहेत. तीन हजार २०० चौरस मीटर रस्त्यावरील ७१० खड्डे बुजविण्याचे आव्हान अजूनही बाकी आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार सायंकाळपर्यंत हे खड्डे बुजविण्यात येतील, असा विश्वास सहआयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला.
.....