लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या संचालकपदासाठी ३० मार्च रोजी मतदान आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. मंगळवारच्या पाचव्या दिवशी बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह या निवडणुकीसाठी आतापर्यंत ४१ जणांनी त्यांची ७२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
या जिल्हा बँकेच्या २१ संचालकांसाठी ३० मार्च रोजी मतदान होऊन ३१ मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर या बँकेची सत्ता कोणाच्या हाती जाईल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी उमेदवारी दाखल करण्यासाठी ४ मार्च ही शेवटची मुदत आहे. यानंतर छाननी आणि त्यात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना ८ ते २२ मार्च रोजी उमेदवारी मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवार २३ मार्च रोजी निश्चित होणार आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये श्रीमंत बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या टीडीसीसी बँकेची ही पंचवार्षिक निवडणूक आहे. या बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी राज्याच्या सत्तेत एकत्र आलेल्या महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्ष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्र पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचे घोषित केले. त्यांना या बँकेवर सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असलेले भाजपचे भाऊ कुऱ्हाडे यांच्या पॅनलशी सामना करावा लागणार आहे.
..........
फोटो आहे.
कॅप्शन - टीडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल करताना विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील, सोबत आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव शिंदे आदी.
.............