सुरेश लोखंडे ।ठाणे : प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये तीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यासाठी राज्य शासनाच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ७२४ शाळांचा समावेश असून त्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) सर्वाधिक ५६० शाळांवर बंद होण्याचे संकट घोंगावत असल्याचे शालेय सर्व्हेक्षणांती निदर्शनास आले आहे.जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या प्रशासनांच्या नियंत्रणात सात हजार ५७५ माध्यमिक व प्राथमिक शाळा आहेत. यापैकी काही शाळांच्या सुमारे १५ दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३६१ शाळांमध्ये तीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळली होती. मात्र, नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार ७२४ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यात सर्वाधिक ५६० शाळा जि.प.च्या असल्याचे निदर्शनात आले आहे. यात शहापूर तालुका २०१, तर मुरबाड तालुक्यातील सर्वात जास्त २०० शाळा आहेत. भिवंडीच्या ९७ शाळा, अंबरनाथ ३६ आणि कल्याण २६ शाळा जि.प.च्या आहेत. ठाणे महापालिका २१, उल्हासनगर महापालिका १४, भिवंडी महापालिका ५, नवी मुंबई २८ आणि केडीएमसीच्या ४२ शाळांचा समावेश आहे.
पटसंख्येअभावी ७२४ शाळा बंद होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:44 AM