लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील महिन्यापासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ दोनच दिवस लसीकरण विविध भागांत सुरू आहे. त्यातही ऑगस्ट महिन्यात १२ दिवसांत जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसी उपलब्ध झाल्याने आठवड्यातून दोनवेळाच लसीकरण झालेले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्केच अर्थात केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्याचे लसीकरण अद्यापही कितीतरी पटीने मागे आहे. वेग अधिक असता तर आतापर्यंत ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण होणे गरजेचे होते.
कोरोनाला रोखण्यासाठी जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला वेगाने लसीकरण मोहीम सुरू होती. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन, हेल्थवर्कर यांना लस दिली. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याचे लसीकरणाचे एकूण टार्गेट ९९ लाख ४२ हजार ४०७ एवढे अपेक्षित धरले आहे. परंतु, आतापर्यंत केवळ २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये १८ लाख ७१ हजार ६६७ जणांना पहिला, तर केवळ ७ लाख ८१ हजार ७७४ जणांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे.
मागील महिन्यापासून तर लसीकरणाचा वेग फारच मंदावला आहे. आठवड्यातून एक ते दोन वेळाच लसीकरण होत आहे. मध्यंतरी, पाऊस जास्तीचा झाल्याचे कारण देऊन लस मिळत नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. परंतु, त्याच कालावधीत किंबहुना आतादेखील खाजगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. खाजगी रुग्णालयांना लसी मिळतात आणि शासकीय यंत्रणांना का मिळत नाहीत, यावरूनदेखील सध्या वादंग सुरू आहे. त्यातही मागील १२ दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्याला केवळ दोन वेळाच लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तोदेखील तुटपुंजा असून या कालावधीत केवळ ९९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे. त्याचे नियोजन करताना प्रत्येक महापालिकेला तीन ते पाच हजार लसींचाच साठा मिळू शकलेला आहे. त्यामुळेच आठवडाभरात केवळ दोन वेळाच लसीकरण मोहीम सुरू असल्याचे दिसून आले आहे.
आता १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवासाची मुभा दिली आहे. परंतु, लाखो नागरिकांना कुठे पहिला, तर कुठे दुसरा डोस अद्यापही मिळू शकलेला नाही. मागील १२ दिवसांत ३ ऑगस्ट ६६ हजार तर ७ ऑगस्टला ३३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. एकूणच जिल्ह्यातील एकूण लक्ष्यांकाच्या मानाने लसीकरणाचा वेग प्रभावी असता, तर आतापर्यंत जिल्ह्यात ७३ लाख ४३ हजार ७९१ जणांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अवघे २६ लाख ५३ हजार ४४१ जणांचेच लसीकरण झाले आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
जिल्हानिहाय- पहिला डोस-दुसरा डोस - टक्केवारी
ठाणे ग्रामीण - ३६१९६१ - ११९४५७ - २३
कल्याण-डोंबिवली - ३२६२२८ - १२९७२७ - ४०
उल्हासनगर- ८०९३८ - २४३२४ - ३०
भिवंडी- ८७०७४ - २९९४५ - ३४
ठाणे - ४४५४३४ - १७५२८३ - ३९
मीरा-भाईंदर-२३८९७१ - १३०९५२ - ५५
नवी मुंबई- ३३१०६१ - १७२०८६ - ५२
------------------------------------------------
एकूण - १८७१६६७ - ७८१७७४ - ४०